लोकसंख्येच्या आकड्यांचा बोध
भारताची लोकसंख्येचे धर्मनिहाय आकडे जाहीर झाले आहेत. खरे तर ती १२५ कोेटीवर पोचली आहे ही बाब सर्वात महत्त्वाची आहे. पूर्वी लोकसंख्या वाढत चालल...
https://mllivetestimpress.blogspot.com/2015/08/blog-post_27.html
भारताची लोकसंख्येचे धर्मनिहाय आकडे जाहीर झाले आहेत. खरे तर ती १२५ कोेटीवर पोचली आहे ही बाब सर्वात महत्त्वाची आहे. पूर्वी लोकसंख्या वाढत चालली की चिंता व्यक्त केली जात असे आता मात्र या बाबतीत बर्यापैकी सुधारणा झाली आहे. कारण लोकसंख्या हे काही नेहमीच ओझे नसते. काही वेळा तिला महत्त्वही असते. भारताच्या लोकसंख्येत तरुणांची संख्या जास्त आहे. जगात या बाबतीत आपण आघाडीवर असल्याने भारताला जगातला सर्वात तरुण देश मानले जातेे. लोकसंख्येचा हा तपशील आपल्याला उत्साहित करणारा आहे. पण काही आकडे कोणाला सोयीचे तर कोणाला गैरसोयीचे असतात. काल जाहीर झालेल्या २०११ सालच्या जनगणनेच्या काही आकड्यांनी समाजाच्या एका घटकांत नक्कीच नाराजीचा सूर उमटला आहे. कारण या आकडेवारीत देशातली मुस्लिमांची संख्या हिंदूंपेक्षा गतीने वाढत असल्याचे म्हटले आहे. ही नाराजी हा आपल्या देशातल्या काही हिंदुत्ववादी नेत्यांनी सातत्याने केलेल्या प्रचाराचा परिणाम आहे. त्यांच्या प्रचाराला आणि राजकारणाला आता या आकड्यांनी वेग येणार आहे.
आपल्या देशातला नागरी कायदा सर्वांना समान नाही. हिंदूंना द्वीभार्या प्रतिबंधक कायदा लागू आहे पण तो मुस्लिमांना लागू नाही. त्यांना चार बायका करता येतात. ते कुटुंब नियोजनाचे निर्बंध फार पाळत नाहीत असाही समज आहे, काही मुस्लिम धर्मगुरुंनी कुुटुंब नियोजनाला उघडपणे विरोध केलेला आहे. त्यामुळे हा समज अधिकच दृढ होतो. चार बायका आणि कुटुंब नियोजनाला विरोध यामुळे मुस्लिमांची संख्या वाढत जाईल किंबहुना त्यांनी तसे नियोजनच केलेेले आहे असा प्रचार केला जातो. यातून या देशात हिंदूच अल्पसंख्यक होतील आणि मुस्लिम बहुसंख्यक होऊन भारत देश हिंदू राष्ट्र होण्याच्या ऐवजी इस्लामी राष्ट्र होऊन जाईल अशी भीती हे लोक घालत असतात पण या आकडेवारीतला मुस्लिम लोकसंख्या वाढीचा वेग पाहिला असता कोणीतरी मोठे कारस्थान रचून ही संख्या जाणीवपूर्वक वाढवत असेल असे काही वाटत नाही. कारण मुस्लिमांच्या संख्यावाढीचा वेग हिंदूंपेक्षा अगदी नगण्य म्हणावा एवढाच जास्त आहे आणि त्यांचा हा वेग हिंदूपेक्षा काही प्रमाणात जास्त असला तरीही तो त्यांच्याच पूर्वीच्या वेगापेक्षा कमी झालेला आहे. भारतात हिंदूपेक्षा आपली संख्या वाढावी म्हणून त्यांनी कारस्थान रचले असते तर त्याचा वाढीचा वेग पूर्वीच्या दशकापेक्षा या दशकात घटला नसता. मुस्लिमांच्या संख्येत होणारी ही वाढ धार्मिक कारणातून झालेली नाही तर इतर अनेक सामाजिक कारणांतून झालेली आहे.
मुस्लिम लोक सामाजिक आणि आर्थिक बाबतीत विशेषत: शैक्षणिक बाबतीत हिंदूंपेक्षा मागासलेले आहेत. आपण हे सारे धार्मिक भेद बाजूला ठेवून लोकसंख्येच्या वाढीचा वेग निव्वळ आर्थिक निकषावर तपासून पाहिल्यास आपल्याला असे दिसेल की, गरीब लोकांत अपत्ये जास्त असतात तर श्रीमंत आणि सुशिक्षित लोकांत ती कमी असतात. तेव्हा मुस्लिमांच्या संख्यावाढीचा वेग हा काही आंतरराष्ट्रीय कटाचा भाग नाही तर तो त्यांच्यातल्या गरिबीचा परिपाक आहे. शैक्षणिक मागासले पणाचाही हा परिणाम असू शकतो. विशेषत: महिलांच्या शिक्षणाचा परिणाम लोकसंख्येवर होत असतो. महिला शिकली आणि नोकरी करायला लागली की, तिच्या मनात आपले कुटुंब नियोजनबद्ध असले पाहिजे असा विचार यायला लागतो कारण ती तिची गरज असते. ती आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने कुटुंबातले लोकही तिच्यावर अधिक मुले व्हावीत म्हणून दबाव आणत नाहीत. शेवटी तिची नोकरी आणि कमायी हे तिच्याइतकीच तिच्या कुटुंबाचीही गरज असते. मुस्लिम समाज आता सुधारत चालला आहे.
या समाजातल्या अनेक तरुणी नागरी कायद्याविषयी उघडपणे बोलायला लागल्या आहेत. लहान वयात विवाह करण्याच्या आणि शिक्षण पूर्ण न होताच विवाहाच्या जोखडात अडकवण्याच्या प्रथेच्या विरोधात आवाज उठवायला लागल्या आहेत. त्यांच्या पालकांच्याही मनात बदलत चाललेल्या परिस्थितीची जाणीव जागी होत आहे. त्याचा परिणाम दिसत आहे. १९९० ते २००१ या दशकापेक्षा २००१ ते २०११ या दशकात मुस्लिमांच्या लोकसंख्येच्या वाढीचा वेग कमी झालेला आहे तो त्यामुळेच आहे. आता कोणी मौलवीही कुटुंब नियोजनाला फार प्रकटपणे विरोध करताना दिसत नाहीत. या समाजात आता कुटुंब नियोजनाला फारसा प्रतिकारही होत नाही. लोकसंख्येतल्या याच बाबी फार महत्त्वाच्या ठरतात कारण त्या राजकारणाला गती देणार्या असतात पण खरे तर ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येचे प्रमाण, मुला मुलींचे गुणोत्तर, शिक्षणाचे प्रमाण याही बाबीतून आपल्याला अनेक बाबी दिसत असतात. मुस्लिमांची संख्या वाढत आहे म्हणून नाराजी व्यक्त करणार्या कथिन हिंदुत्ववादी नेत्यांनी याही काही आकड्यांकडे पाहिले पाहिजे कारण मुला मुलींच्या संख्येतले गुणोत्तर हिंदू समाजात बिघडलेले आहे. ते मुस्लिम आणि ख्रिश्चनांत हिंदूंपेक्षा चांगले आहे. तेव्हा इतरही अाकडे वारी पाहिली पाहिजे आणि ती आग लावण्यापेक्षा सुधारणा करण्यासाठी वापरली पाहिजे.






